घुग्घुस: काँग्रेसचे प्रा. हेमंत उरकुडे यांनी अधिकृतरित्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा घुग्घुस काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडे नुकताच दिला आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी त्याला मंजूर केला राजीनामा मंजूर केल्याबद्दल धन्यवाद अशी पोस्ट समाज माध्यमात प्रा. हेमंत उरकुडे यांनी टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे प्रा. हेमंत उरकुडे यांनी आपल्या समर्थकांसह २१ ऑक्टोबर २०२३ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याबद्दल घुग्घुस काँग्रेसतर्फे नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन २१ ऑक्टोबर २०२३ ला सायंकाळी ६ वाजता प्रमोद महाजन मंच, घुग्घुस येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत भाजपाचे प्रा. हेमंत उरकुडे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.
तर काही दिवसापूर्वी घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि धनोजे कुणबी समाज संघटना घुग्घुसचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे सुधाकर बांदूरकर यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा घुग्घुस काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडे देत काँग्रेसला रामराम केला. ओबीसी नेत्यांनी एकापाठोपाठ काँग्रेसला रामराम करणे सुरु केल्याने राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे.
घुग्घुस काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वावर ओबीसी नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
प्रा. हेमंत उरकुडे यांची प्रतिक्रिया घेतली असता, मी अधिकृतरित्या राजीनामा दिला आहे असे सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांची प्रतिक्रिया घेतली असता, माझ्या कडे राजीनामा आला नाही असे सांगितले.










