घुग्घुस: येथील शांतीनगर परिसरातील बौद्ध विहाराचा रस्ता विहाराकरिता मोकळा करण्यात यावा, नगर परिषदेने विहार परिसरात बांधकामाकरीता दिलेली एनओसी तत्काळ रद्द करण्यात यावी, बुद्ध विहार परिसर कायम स्वरूपी बौद्ध विहार कमेटीला देण्यात यावे अशा मागणीसाठी भदंत रत्नमणि थेरो यांनी ७ सप्टेंबरपासून ‘बेमुदत उपोषण’ सुरु केले.
‘बेमुदत उपोषणा’ च्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते भदंत रत्नमणि थेरो यांची प्रकृती खालावली. प्रशासनाने आतापर्यंत ‘बेमुदत उपोषणा’ ची दखल न घेतल्यामुळे संतप्त बौद्धबांधव आक्रमक झाले असून दोन दिवसानंतर शांतीनगर येथून नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे असे बौद्धबांधवांतर्फे सांगण्यात आले आहे.
प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी गुरुवार, १० सप्टेंबर रोजी उपोषणकर्ते भदंत रत्नमणि थेरो यांचे वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी रुग्णालयात भर्ती होण्यासाठी सांगितले परंतु उपोषणकर्ते भदंत रत्नमणि थेरो यांनी यासाठी नकार दिला.
मागण्यापूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.










