घुग्घुस : पारंपरिक संस्कृती, ग्रामीण जीवनशैली आणि शेतकरी परंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने घुग्घुस येथे तान्हा पोळ्यानिमित्त नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तान्हा पोळा, गणपती, दुर्गाउत्सव आयोजन समिती घुग्घुस व भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी गांधी चौक येथे ही आकर्षक नंदीबैल सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली.
चिमुकल्यांनी विविध रंगांनी आणि आकर्षक सजावटीने नंदीबैल सजवून मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेच्या निमित्ताने गांधी चौक परिसरात चिमुकल्यांनी सजविलेले आकर्षक नंदीबैल पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध रंग, फुलांची सजावट, पारंपरिक वस्त्रसजावट आणि कलात्मक मांडणीमुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विवेक बोढे, ठाणेदार प्रकाश राऊत, सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल डाहुले, सहायक पोलिस निरीक्षक पवन राठोड, लॉयड्स मेटल्स कंपनीचे ए.जि.एम. तरुण केशवाणी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अमोल थेरे, नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेवक गणेश पिंपळकर, नगरसेविका वैशाली ढवस, नगरसेविका चैताली सातपुते, भाजपाचे विनोद चौधरी, आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कुटेमाटे, तसेच बबलू सातपुते, धनराज पारखी, प्रेमलाल पारधी, सुरेंद्र भोंगळे, असगर खान, सुरेंद्र जोगी, हेमंत कुमार, प्रदीप जोगी, शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश डोंगे, विनय बोढे, सतीश बोन्डे, संजय उपाध्ये, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, सविता बोढे, सिमा पारखी, अमीना बेगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नगरसेवक विवेक बोढे म्हणाले की, “तान्हा पोळा ही केवळ एक परंपरा नसून आपल्या मातीत रुजलेली संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी जोडलेली भावना आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात चिमुकल्यांना आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि पारंपरिक सणांशी जोडून ठेवण्यासाठी तान्हा पोळ्यासारखे उत्सव साजरे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण होतो.”
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम पारितोषिक २ हजार १ रुपये जान्हवी सावे, द्वितीय पारितोषिक १ हजार ५०१ रुपये अंश कोयाडवार, तृतीय पारितोषिक १ हजार १ रुपये रेआंश बोबडे, चतुर्थ पारितोषिक ७०१ रुपये मोहित बोबडे, तर पंचम पारितोषिक ५०१ रुपये मयंक घाटे यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
घुग्घुस येथे या नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन सलग नवव्या वर्षी करण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून तान्हा पोळ्याच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती जपण्याचे आणि बालकांमध्ये आपल्या संस्कृतीची आवड निर्माण करण्याचे कार्य आयोजन समितीच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शंकर नागपुरे यांनी तर आभार संजय भोंगळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे उपाध्यक्ष योगेश घोडके, सचिव सौरभ घोडके, सहसचिव प्रवीण ठाकरे, संघटक प्रणय काटवले, सहसंघटक गणेश राजूरकर, सचिन नांदे, रवी घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले.










